मुंबईला आपल्या देशासरखाच अनेक वर्षांचा इतिहास आहे. विविध जुन्या नवीन घटनांचं साक्षीदार असलेलं हे शहर रोज नानाविध ठिकाणांहून येणाऱ्या प्रत्येकाला आपलंसं करतं. इथल्या जुन्या पण तितक्याच मजबूत इमारतींपासून ते ज्याशिवाय मुंबईची ओळख अपुरी असलेल्या समुद्रापर्यंत सगळं काही निराळं आणि इतर कुठे फार न आढळणारं.
हे शहर कधीच झोपत नाही असं म्हणतात. पहाटेपासून ते मध्यरात्रीपर्यंत इथे त्या त्या वेळेची वर्दळ पाहायला मिळते. पहिल्या लोकलच्या ठरलेल्या प्रवशांपासून ते शेवटच्या local च्या काठोकाठ गर्दीपर्यंत इथे नेहमी माणसांचा राबता असतो. फक्त नोकरदार वर्गच नाही तर इथले व्यावसायिकही सतत कार्यरत असतात. वेळ पाळणं आणि सतत काम करणं ह्या गोष्टी पाळल्याशिवाय ह्या शहरात कोणाचाच निभाव लागत नाही.
इतर शहरात जन्म झाला तरच त्या शहराचं होता येतं. मुंबई ह्याला मोठा अपवाद. इथे जो टिकून दाखवेल त्याला हे शहर आपलं मानतं. अडलेल्याला मदत करत प्रत्येक कष्टकऱ्याला काम देतं आणि त्याला जणू काही इथे राहायला भाग पाडतं. इथल्या समुद्रासारखी इथली माणसंही मन मोठं करत (राहायची जागा छोटी असूनही) कायमच मदतीसाठी तत्पर असतात. Spirit of mumbai ह्या शहराचा वेगळेपणा नक्कीच टिकवून आहे.
मुंबईकर एकवेळ आग्रहाने एखाद्याला घरी बोलावणार नाहीत, पण आलेल्याला नेमक्या ठिकाणी सोडणं, त्याकरता कुठलं वाहन सोयीचं ह्याकडे पाहणं, प्रसंगी तिकिटाची सोय करणं, परत जायची व्यवस्था आहे की नाही ह्याची खबरदारी घेणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे नवीन असलेल्या, प्रवासाच्या काळजीने बिथरलेल्या पाहुण्याला धीर देणं हे सगळं मुंबईकर इमाने इतबारे करतात.
मुंबई आणि इथली खाद्यसंस्कृतीही तितकीच खास आहे. इथे मिळणारे मराठमोळे पदार्थ असो किंवा उडपी हॉटेल मधला menu, इथे कोणीच कधीच उपाशी परत जात नाही. रस्त्यावर स्वस्त दरात मिळणाऱ्या पदार्थांपासून ते पंचतारांकित restaurants पर्यंत इथे सगळे पर्याय उपलब्ध असतात, ते ही दिवसातले काही तास वगळता सगळ्या वेळात. तरीही मुंबई म्हटली की वडापाव हे समीकरण ठरलेलं, त्याची जागा कोणीच नाही घेऊ शकत!
काही शहरं तिथे जन्मलेल्या माणसांमुळे मोठी होतात, काही तिथे असलेल्या ऐतिहासिक वास्तूंमुळे! मुंबईत हे सगळं असूनही हे शहर दिवसागणिक छोटं होत इथल्या माणसांना मोठं करत आलंय. मग ते इथे येणारे पर्यटक असो किंवा इथे राहायची स्वप्न उराशी बाळगून आलेले अनेकविध लोक , हे शहर कायमच प्रत्येकाला आसरा देत राहिलंय. अथांग समुद्राने नटलेलं हे शहर कदाचित म्हणूनच एका प्रवाहात वाहत चाललयं, कधीही न थांबण्यासाठी!
Discussion about this post
No posts
व्वा. खूपच सुंदर. 👍👍👍
मस्तच, प्राजक्ता 👍